असा होता आठवडा(दि. १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२०)
आठवड्यातील महत्वाच्या बातम्यांचा गोषवारा (न्यूज डायजेस्ट)
दि. 12 जानेवारी 2020
· राज्यपाल
श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख
उपस्थितीत जुहू चौपाटी येथे, स्वामी विवेकानंद यांच्या
जयंतीनिमित्त “रन फॉर यूथ, यूथ
फॉर नेशन'' मॅरेथॉन आयोजित.
· राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे अभिवादन.
· राजमाता जिजाऊ माँसाहेब व
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मराठी भाषा मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याद्वारे अभिवादन.
· राज्य उत्पादन शुल्क मंत्री
दिलीप वळसे-पाटील
यांच्यामार्फत विभागाचा आढावा.
मंत्रिमहोदयांचे निर्देश : अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध नागरिकांना
तक्रारीकरण्यासाठी उपलब्ध नियंत्रण कक्षाचे टोल फ्री क्रमांक 18008333333 तसेच व्हॉट्स ॲप क्रमांक 8422001133 याची व्यापक प्रसिद्धी करा. प्राप्त तक्रारींवर
प्राधान्याने कारवाई करा. 26 जानेवारी 2020 रोजी प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयसूचीमध्ये ग्रामरक्षक दल
स्थापनेचा विषय समाविष्ट करण्याबाबत कार्यवाही करा.
दि. 13 जानेवारी 2020
· जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस
महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र
राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे, मुख्यमंत्री
श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. वाहतुकीचे नियम शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवल्यास, ते
आपल्या कुटुंबीयांना समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना
सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक असल्याचे श्री.ठाकरे यांचे
प्रतिपादन.
· पुणे महानगर प्रदेश विकास
प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे मेट्रोच्या कामाचा उपमुख्यमंत्री श्री.अजित
पवार यांच्यामार्फत आढावा. शिवाजीनगर- हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 साठी आवश्यक 15 हजार चौ. मी. जागा
उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे सूतोवाच.
· 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या माध्यमातून
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचवण्याचा पर्यटन विभागाचा निर्णय.
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या
अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : रखडलेल्या झोपडपट्टी
पुनर्वसन योजनांना गती द्या, झोपडपट्टी पुनर्वसन
योजनेतील सदनिकांची संख्या वाढवा. झोपडपट्टी धारकांच्या
समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय यंत्रणा निर्माण करा. म्हाडा
वसाहतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावलीखाली 15 दिवसांत प्रस्ताव सादर करा. गोरेगाव पत्राचाळ पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा, धारावी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लघुउद्योगांना वेगळी जागा द्या.
· सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागाचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : शिष्यवृत्ती योजना, स्वाधार योजना, वसतिगृहे आणि निवासी शाळा, रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या योजना यावर नव्याने काय करता येईल, याबाबत सविस्तर अहवाल सादर करा. ऊस तोडणी
मजुरांच्या मुलांसाठी निवासी शाळा योजना सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे
श्री.धनंजय मुंडे यांचे निर्देश.
· उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्यामार्फत शालेय
शिक्षण विभागाचा आढावा. महत्वाचे मुद्दे : पहिली ते दहावीपर्यंत
इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा सक्ती, ग्रामीण भागात
चांगले शिक्षण उपलब्ध करण्यासाठी धोरणामध्ये आवश्यक बदल, जिल्हा परिषदांच्या शाळादुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा
परिषदांना देण्यात येणाऱ्या '25-15' लेखाशीर्षातून 20 टक्के निधी शाळांना, शाळांच्या वीजबिलांचा
प्रश्न सोडविण्यासाठी अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी महाऊर्जाच्या (मेडा) माध्यमातून शाळांमध्ये सौरवीज प्रकल्प, दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर मुंबईसह पाच महानगरपालिकांच्या शाळांचा विकास. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ग्रामीण शाळांच्या पायाभूत सुविधा
विकासासाठी प्रयत्न, कमी पटसंख्या झालेल्या शाळातील
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन.
दि. 14 जानेवारी 2020
· मुंबई महानगरपालिका
क्षेत्रातील पशू-पक्षी विक्रीच्या दुकानांची नोंदणी करण्याचे आवाहन
· मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या
अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : अनुदानित शाळातील शिक्षणाचा
दर्जा तपासावा. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण
पद्धतीत बदल करा. र्व्हच्युअल क्लासरुम उभारा.
ई लर्निंगवर
भर द्या. शालेय
शिक्षण विभागाच्या उपक्रमात उद्योजकांची मदत घ्या. स्कूलबसची
सुरक्षितता तपासून घ्या.
· रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला
जोडणा-या माणगाव
तालुक्यातील आंबेत पुलाच्या दुरूस्तीसंदर्भात आणि पर्यायी व्यवस्थेसंदर्भात उद्योग
राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याद्वारे आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : आंबेत पुलाच्या दुरुस्तीचा वेग वाढवा. मे 2020 पर्यंत सर्व कामे पूर्ण करा. पर्यायी व्यवस्था
म्हणून प्रवासी बोट सुरु करा.
· सार्वजनिक आरोग्य व कुटुंब
कल्याण,वैद्यकीय
शिक्षण, अन्न औषध प्रशासन,वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
· उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई यांच्याद्वारे मुख्यमंत्री
रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा आढावा. या योजनेत प्राप्त 18 हजार कर्ज मंजुरीसाठी पात्र अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश.
· चणे -फुटाणे विकून शिक्षणासाठी
धडपडणाऱ्या सातारा जिल्ह्यातील राजेवाडीच्या संतोष साबळेला मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचा दिलासा. प्रामाणिक
प्रयत्नांसाठी मदतीचे आश्वासन.
· नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्याद्वारे नगरविकास
विभागाच्या कामांचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : घनकचरा व्यवस्थापनावर अधिक लक्ष देतांनाच राज्यस्तरीय बृहत प्रकल्प आराखडा
तयार करा. 1 मे पर्यंत संपूर्ण राज्यात कचरा
विलगीकरणाची प्रक्रिया अवलंबवा. घनकचरा
व्यवस्थापनासंदर्भात राज्यस्तरावर नोडल अधिकारी नेमा. राज्यातील
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छता, पाणी, रस्ते, स्वच्छतागृहांसाठी आराखडा तयार करावा.
· मुंबईतील वडाळा येथील जीएसटी
विभाग मुख्यालयाची इमारत व त्यालगत असणाऱ्या मेट्रो रेल्वे स्थानकाच्या उभारणीतील
अडथळे याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. दोन्ही
प्रकल्पांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे श्री. पवार
यांचे निर्देश.
· महसूलवाढीच्या अनुषंगाने
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडून विविध विभागांचा आढावा.
· मुंबईतील ‘इस्टर्न फ्री वे’ मार्गाला माजी मुख्यमंत्री
दिवंगत विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची नगरविकास विभागाला सूचना.
· राज्यातील गुन्हेगारी
संपविण्यासाठी लागेबांधे न बघता कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांचे पोलीस
महासंचालकांना निर्देश
· अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून विभागाच्या कामकाजाचा आढावा. 26 जानेवारीला जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन
योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती.
· दिव्यांग वित्त व विकास महामंडळ
आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचा, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री.धनंजय
मुंडे यांच्याद्वारे आढावा. दिव्यांग आणि साहित्यरत्न
अण्णा भाऊ साठे महामंडळांच्या कामाला गती देण्याचा निर्णय.
· महालक्ष्मी सरस प्रदर्शन
शुक्रवार दि. 17 जानेवारीपासून
सुरु होणार. यंदा या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रासह 29 राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण महिला कारागीरांचा सहभाग. एकूण 511 स्टॉल पैकी खाद्यपदार्थांचे 70 स्टॉल असतील, अशी, ग्रामविकास
मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांच्याद्वारे माहिती.
· उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा
मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : उच्च शिक्षणातील भौतिक
सुविधांच्या उणिवा शोधा. नाविन्यपूर्ण संशोधनाला
प्रोत्साहन, शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा
विकास करण्यासाठी शिक्षणाचे मूल्यांकन आणि प्रमाणिकरण करा. क्षेत्रीय असंतुलन दूर करण्यासाठी व्हर्च्युअल क्लासरुम तयार करा. डिजीटल लर्निंग प्रक्रिया सुरु करा. माहिती व
तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने 'व्हर्च्युअल क्लासरुम' कनेक्टीव्हिटीचा प्रस्ताव सादर करा. आधुनिक
शिक्षणपद्धतीचा समावेश अभ्यासक्रमात करा. मुंबईतील सर ज.जी.कला संस्थेत कला विषयक वेगळे अभ्यासक्रम सुरु करा.
· परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्याद्वारे परिवहन
विभागाचा आढावा. मंत्रीमहोदयांचे निर्देश : ग्रामीण भागात वातानूकुलीत
सेवा सुरु करा, सुरक्षित प्रवासासाठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करा.
· अन्न, नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भूजबळ यांच्या
अध्यक्षतेखाली नाशिक विभागातील रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लगार समितीची बैठक. नाशिक विभागातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगर सिंचन
आवर्तनासाठी पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य
नियोजन करण्याचे श्री.भुजबळ यांचे निर्देश.
· कुळगाव बदलापूर शहरातील पाणी
पुरवठा योजनेबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याद्वारे
आढावा. कुळगाव - बदलापूर परिसरातील जुन्या नळ योजनेतील पाईपलाईनची दुरुस्ती सुरु करण्याचे
निर्देश.
· पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री
गुलाबराव पाटील यांच्याद्वारे रत्नागिरी जिल्हयातील शिरगाव मुंढे पाणी पुरवठा योजनेचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : तिवरे नळ पाणी पुरवठा योजनेचे तातडीने काम सुरु करा. शिरगाव मुंढे पाणी पुरवठा योजनेत निगुडवाडी व वेताळवाडी या दोन वाड्यांचा
समावेश करा. मुंढे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या
वाड्या -वस्त्या जलजीवन मिशन कार्यक्रमात समाविष्ठ करुन
नवीन योजना घ्या.
· नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीएची आढावा बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश : ‘पीएमआरडीए’च्या पाणी पुरवठ्यासाठी सर्वंकष आराखडा
सादर करा. पुणे शहरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी
प्रस्तावित रिंग रोडचे काम टप्प्याटप्प्याने करणे
संयुक्तीक ठरेल का, याबाबत चाचपणी करा. पुणे शहराच्या सुधारित विकास आराखड्याची प्रक्रिया एप्रिल पूर्वी पूर्ण
करा.
· लहान मुलांवरील वैद्यकीय उपचार
करणारे मुंबईतील वाडिया रुग्णालय सुरु राहण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांची मध्यस्ती. महापालिका आणि राज्य शासन हे आवश्यक निधी वाडिया रुग्णालयास उपलब्ध करून
देईल. इतर मुद्यांवर येत्या 10 दिवसांत निर्णय घेऊन हे रुग्णालय सुरळीतपणे सुरु राहील, तसेच कामगार-कर्मचारी यांच्या नोकऱ्या अबाधित राहतील
हे पाहण्याचे, मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
· उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय विभागाची आढावा
बैठक. उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश : राज्य लोकसेवा आयोगाच्या
परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी नागपूर आणि औरंगाबाद येथे चालविण्यात येणाऱ्या पूर्व
प्रशिक्षण केंद्रांसह महसुली विभाग मुख्यालयात स्वत:ची इमारत
बांधून प्रशिक्षण केंद्रे सुरू करा. या घटकातील
युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कंपन्यांच्या मागणीप्रमाणे कौशल्याधारित
अभ्यासक्रम राबवा. सामाजिक न्याय विभागाला
लोकसंख्येच्या प्रमाणात अनुदान मिळण्याच्या मागणीवर अनुसूचित जातींची आकडेवारी जमा
करा. परदेशी उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या
शिष्यवृत्तीचा लाभ गुणवत्तेनुसार देताना पालकांच्या आर्थिक स्थितीला महत्त्व द्या. शिष्यवृत्तीचा लाभ योग्यरीत्या पोहोचविण्यासाठी लाभार्थ्यांची आधार
क्रमांकाशी जोडणी करा. गरजूंना घरे मिळणे शक्य व्हावे
यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसोबत रमाई आवास योजनेचे एकत्रीकरण करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास
योजनेत शाळा व अंगणवाड्यांच्या बांधकामाचा समावेश करा.
· रस्ते सुरक्षासंदर्भात
विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सार्वजनिक बांधकाम
मंत्री श्री. अशोक
चव्हाण यांच्याद्वारे आढावा. राज्य व जिल्हा मार्गावरील
अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅक स्पॉट) कमी करण्यासाठी कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश.
· डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रलंबित कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम
मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याद्वारे आढावा. या वैद्यकीय महाविद्यालयाची व रुग्णालयाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण
करण्याचे निर्देश.
· पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय
विभागाचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्यामार्फत
आढावा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : दूध, अंडी, मांस व
लोकर उत्पादन वाढीसाठी नवीन योजना राबवा. कृत्रिम
रेतनाव्दारे पशुधनामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून उत्पादन वाढवण्यावर भर द्या. पशुधनाचे रोगराईपासून संरक्षण करून जास्त दूध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर ही पशुजन्य उत्पादने वाढवा. ग्रामीण
शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना दुधाळ जनावरे, शेळी गट, कुक्कुट पक्षी वाटप करून पूरक उत्पन्न व स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून
द्या. पशुधनास लागणारे वैरण व पशुखाद्याची उपलब्धता
वाढवा. पशुधनास लागणाऱ्या लसींची निर्मिती करा. वराह मांसाची मागणी जास्त असून यासाठी अधिक उत्पादनाच्या विदेशी वराह
पालनासाठीची योजना राबवा. शेतकऱ्यांच्या वैयक्तिक
लाभाच्या योजनांची व्यापकता वाढवा. मत्स्य
प्रकल्पांसाठी पायाभूत सुविधा विकसित करा. मासेमारीसाठी
एलईडीचा वापर टाळण्यासाठी पोलिसांची मदत घ्या. दुग्धविकास
विभागच्या मालमत्तांचा सविस्तर आराखडा सादर करा.
· वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या
अध्यक्षतेखाली वैद्यकीय शिक्षण विभाग, आयुर्वेदिक
शिक्षण तसेच हाफकीन संस्थेची आढावा बैठक. मंत्री महोदयांचे निर्देश : नवजात शिशूंना जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात दक्षता घ्या. त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालय यांच्या ठिकाणी
असलेल्या सोईसुविधा यांचा जास्तीत जास्त उपयोग रुग्णांसाठी करा. उपचार यंत्रणा नादुरुस्त होणार नाही याची काळजी घ्या. सर्व कामे कालबध्दतेने करा. नवीन वैद्यकीय
महाविद्यालये उभारताना तेथील सोईसुविधा, अभ्यासपद्धती
प्रयोगशाळा आदींबाबत योग्य विचार करा. वैद्यकीय
महाविद्यालयातील जागा कशा वाढतील हे पहा.
दि. 15 जानेवारी 2020
· मंत्रीमंडळ निर्णय : इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा 100 फूट व पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट इतकी होणार आहे.
· नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मान्यता.
· रब्बी हंगाम 2019 साठी विमा कंपनीची नेमणूक न होऊ शकलेल्या 10 जिल्ह्यात व्यावहारिक धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना.
|
· कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी
निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र
राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी
करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण. या
प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या कर्जाचा हिस्सा 1470 कोटी रुपये, राज्य शासनाचा हिस्सा 560 कोटी रुपये आणि सीएसआर मधून 70 कोटी रुपये
राहणार. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी सात
वर्षे.
· हंगेरी देशाचे परराष्ट्र
व्यवहार मंत्री श्री.पिटर सिझार्तो यांची राज्यपाल श्री. भगत सिंह
कोश्यारी यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट.
· देशातील समुद्रावरील सर्वात
जास्त लांबी असणाऱ्या मुंबई - पारबंदर प्रकल्पाच्या (मुंबई ट्रान्स हार्बर
लिंक) पुलाच्या पहिल्या गाळा उभारणी कामाचा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ. मुंबई-नवी मुंबईला जोडणारा हा भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प असून वेळेपूर्वीच
तो पूर्ण होईल, असा श्री.ठाकरे
यांच्याकडून विश्वास.
· 'पुणे तेलुगू मडेलवार फंडा' च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 लाख 1 हजार 574 रुपयांचा धनाकर्ष (डीमांड ड्राफ्ट) मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे
सुपूर्द.
· प्रत्येक तालुक्यात एक
रुग्णालय, महात्मा
फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार असल्याची
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. राज्यामध्ये
मोहोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरु करणार.
· जिल्हानिहाय पालकमंत्री
नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेज ऊर्फ
बंटी पाटील आणि भंडारा जिल्हा पालकमंत्रीपदी डॉ.विश्वजीत कदम
यांची नियुक्ती.
· पु.ल. देशपांडे
महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी
चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत चित्रपटसृष्टीत प्रवेश करु
इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी ऑडीशन, मार्गदर्शन
कार्यशाळा पु.ल.देशपांडे महाराष्ट्र
कला अकादमीच्या मिनी थिएटर येथे आयोजित. संपर्क : 022-24308876.
· डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
भरतीप्रक्रियेतील सहाय्यक प्राध्यापक यांच्या इ-सेवार्थ संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्याद्वारे आढावा. प्राधापकांच्या
इ-सेवार्थ संबंधात शासन सकारात्मक असल्याचे मंत्री महोदयांचे
प्रतिपादन.
· रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री श्री. संदीपानराव भुमरे यांच्यामार्फत विभागाची आढावा बैठक. मंत्रीमहोदयांचे निर्देश : मागेल त्याला शेततळे योजनेतील लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान उपलब्ध करुन
द्या. रोहयो अंतर्गंत विहिरींचे उद्दिष्ट वाढवा, फळबाग लागवड योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्या, रोजगार हमी योजनेंर्तगत कामांची माहिती देण्यासाठी तालुकास्तरीय
कार्यशाळेचे आयोजन करा.
· झोपडपट्टी पुर्नविकास
धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टी धारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फुटापर्यंत वाढविण्यासाठी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांच्याद्वारे मुख्यमंत्री
श्री. उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदन.
· महाराष्ट्र राज्य उर्दू
साहित्य अकादमी तसेच महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीवरील कार्याध्यक्ष आणि
अशासकीय सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द करण्याची अल्पसंख्यांक विकास मंत्री श्री.नवाब मलिक यांची घोषणा.
· वाडिया मॅटर्निटी
रुग्णालयासाठी आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास वित्त
विभागाची मान्यता.
दि. 16 जानेवारी 2020
· पेट्रोलियम पदार्थाच्या
संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेद्वारे (PCRA) आयोजित ‘सक्षम अभियान 2020’(संरक्षण क्षमता महोत्सव) कार्यक्रमाचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ
यांच्या हस्ते उद्घाटन. भविष्यासाठी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचे श्री. भुजबळ
यांचे आवाहन.
· शारदानगर (माळेगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने आयोजित "कृषिक 2020" प्रदर्शनाचे मुख्यमंत्री
श्री.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपरिक ज्ञान अचंबित करणारे आहे. या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे
करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आणि शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम करणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा
निर्धार.
· राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
राज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्याद्वारे विभागाचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखा अवैधरीत्या मद्य
विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. राज्य
उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर
करा.
· महसूल मंत्री श्री.बाळासाहेब थोरात यांच्याद्वारे महसूल
विभागाच्या कामांचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : ग्रामीण भागात सेतू केंद्रावर ऑनलाईन प्रणालीसाठी मार्गदर्शन करा. कामकाजाच्या पध्दतीत बदल करा, भूमी हक्क
अधिनियमात मार्चपर्यंत सुसूत्रता आणा. वेगवेगळ्या
परवान्यांचे सुसूत्रीकरण करा.
· कौशल्य विकास व रोजगार
उद्योजकता विभागाचा राज्यमंत्री श्री.शंभूराजे देसाई यांच्या मार्फत आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : ग्रामीण भागावर विशेष लक्ष्य केंद्रीत करुन युवकांना कौशल्य आधारीत
प्रशिक्षण द्या.
· राष्ट्रीय दुग्ध विकास
बोर्डाचे अध्यक्ष श्री. दिलीप रथ यांच्यासमवेत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे
यांची बैठक. मुख्यमंत्र्यांचे निर्देश : दुधाची
उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डे व सहयोगी संस्थांनी कृत्रिम
रेतन सेवा शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचावा. संतुलित
पशुखाद्य, सल्ला व मार्गदर्शन सेवा द्या, गुणवत्तापूर्ण पशुखाद्य व पुरकांचा पुरवठा करा.
· नगरविकास मंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या द्वारे सिडको, नागपूर विकास प्राधिकरण यांचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : गृह प्रकल्प वेळेत पूर्ण करा. महानगरांमध्ये
विविध विकास प्राधिकरणामार्फत बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये
पोलिसांसाठी घरे ठेवा.
· विलेपार्ले येथील संन्यास
आश्रमाच्या अमृत महोत्सवाचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन.
17 जानेवारी 2020
· लोकनेते राजारामबापू यांचे 36 वे पुण्यस्मरण व
जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूधसंघाच्यावतीने उभारलेल्या
दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या
पशुखाद्य प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे
यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यात लवकरच फिरते पशू चिकित्सालय
सुरु करणार असल्याचे श्री.ठाकरे यांचे सूतोवाच.
· लोकनेते राजारामबापू पाटील
यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पुष्पचक्र
अर्पण करून अभिवादन.
· ऑल इंडिया असोसिएशन ऑफ
इंडस्ट्रीमार्फत चर्चासत्राचे आयोजन. उद्योगमंत्री श्री.सुभाष
देसाई आणि इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ.मोहम्मद जावेद शरीफ
उपस्थित. भारत आणि इराण दरम्यान कृषी उत्पादन व्यापार
वाढायला हवा, असे श्री.देसाई
यांचे प्रतिपादन.
· मुंबई विद्यापीठातील सोयी-सुविधा आणि अडचणीसंदर्भात उच्च व
तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्यामार्फत आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश - विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव तातडीने पाठवा. रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक प्रदर्शनीचे आयोजन करा. व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा. कोकण विभागात पर्यटन, मत्स्यव्यवसाय, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग, फलोत्पादन यासारख्या रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असलेल्या
विषयांचे अभ्यासक्रम तयार करा. रोस्टर तपासून
प्राध्यापकांच्या रिक्त पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. मुंबई विद्यापीठाची इमारत दुरुस्ती आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता
सुधारण्यासाठी लागणारा निधी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) च्या माध्यमातून उपलब्ध करता येईल का, याबाबत
विचार करा.
· केबीपी हिंदूजा
महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांची
उपस्थिती. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळण्याचे
राज्यपालांचे आवाहन
· वांद्रे - कुर्ला कॉम्प्लेक्समधील
एमएमआरडीए मैदानावर देशभरातील बचतगट आणि महिला कारागिरांच्या विविध उत्पादनांच्या,
'महालक्ष्मी सरस,' प्रदर्शनाचा राज्यपाल
श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुभारंभ. बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग व्यवसायाचे मालक बनण्याचे राज्यपालांचे
आवाहन.
· राज्यातील विविध शेतकरी संघटना, प्रयोगशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्यासोबत, कृषी
विकासासाठीच्या उपाययोजना, आपले विचार आणि कैफियत
मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कृषीमंत्री श्री.दादाजी भुसे यांची चर्चा. 300 शेतकरी सहभागी. नवीन प्रयोग शेतीत करणारे शेतकरी हे आमचे आयडॉल असल्याचे श्री.भुसे यांचे प्रतिपादन.
· भारत निवडणूक आयोगामार्फत
राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांची पडताळणी आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण
व प्रमाणीकरणाचा पुनरिक्षण कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत राबविण्यात येणार. www.nvsp.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी तसेच यादितील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध. संकेतस्थळ www.ceo.maharashtra.gov.in
· भिवंडी येथील महापालिकेच्या, स्व. मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपये
देण्याचे, नगर विकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे निर्देश.
· झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
कार्यालयात मुंबई व ठाणे विभागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसंदर्भात गृहनिर्माण
मंत्री श्री.जितेंद्र
आव्हाड यांच्यामार्फत आढावा. 'झोपु', योजनेंतर्गत झोपडीधारकांना लवकरात लवकर घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील
असल्याचे श्री.आव्हाड यांचे प्रतिपादन.
· रत्नागिरी जिल्ह्याचे
पालकमंत्री श्री.अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा. मंत्री महोदयांचे निर्देश : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पुणे
येथील माळीणच्या धर्तीवर करण्यात येणार असून घरबांधणी, पाणीपुरवठा
योजना आदी पायाभूत सुविधांच्या कामाला गती द्या. जिल्ह्यातील
आरोग्य सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्ह्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे
करणे आवश्यक असून त्यासाठी वाटुळ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाची पाच एकर जागा
आरोग्य विभागाला द्या. शहरातील जैव वैद्यकीय कचऱ्याचा
प्रश्न निकाली काढण्यासाठी मनोरुग्णालयाच्या परिसरात ‘बायो
मेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लॅंट’ उभारण्याचा प्रस्ताव
तयार करा. आयुष रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकर कार्यान्वित करा. संगमेश्वर आणि सावर्डे (ता. चिपळूण) येथील
ट्रॉमा केअर सेंटर सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून निधी मिळवून कार्यान्वित
करण्यासाठी प्रस्ताव द्या. हिरवा चारा निर्मितीचा
कार्यक्रम हाती घ्या. तीर्थक्षेत्र विकास व पर्यटन
क्षेत्र विकास अंतर्गत ठिकाणांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव तयार करा. रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याला ‘भौगोलिक
मानांकन’ (जी.आय.) मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करा. आंबा
उत्पादकांचे हित लक्षात घेता आंबा निर्यात वाढीसाठी ‘अपेडा’च्या माध्यमातून प्रयत्न करा.
· इस्लामपूरच्या निनाईनगर येथे
क्रीडांगण विकास अंतर्गत बांधण्यात आलेल्या आणि जयंत पाटील स्पोर्टस मंडळ संचलित
व्यायामशाळेचे, मुख्यमंत्री
श्री.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.
· जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत
पुणे जिल्ह्यासाठी सन 2020-21 च्या 520.78 कोटी रुपयांच्या प्रारुप
आराखड्यास आणि 178.21 कोटींच्या अतिरिक्त मागणीस
आणि अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत 128.94 कोटी
रुपयांच्या प्रारुप आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता.
· उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्याद्वारे पुणे
जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा. विविध प्रलंबित आणि
प्रस्तावित विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेण्याचे
श्री. पवार यांचे निर्देश.
दि. 18 जानेवारी 2020
· मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्याद्वारे
करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मीचे दर्शन.
· राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या
अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 69 वा पदवीदान समारंभ.
· सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित देशमुख यांच्या
अध्यक्षतेखाली विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध संचालनालयाचा आढावा. महत्वाचे मुद्दे-राज्यातील
गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण यावर लक्ष
केंद्रीत करणार. प्राचीन सांस्कृतीच्या पाऊलखुणा
असलेल्या कातळ शिल्पांच्या संवर्धनाला प्राधान्य. विभागाचे
पुरस्कार, स्पर्धा आणि शिबीरे यांचे वेळापत्रक पाळले
जाणार.
· राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख
उपस्थितीत, 'चाणक्य वार्ताहर' आयोजित
चर्चासत्र आणि विशेषांकाचे प्रकाशन.
· पर्यावरण आणि पर्यटन मंत्री
श्री.आदित्य ठाकरे
यांच्या अध्यक्षतेखली विभागांच्या कामाचा आढावा.
· माजी सैनिकांच्या विविध संघटना
आणि संस्थांच्या प्रतिनिधीं सोबत माजी सैनिक कल्याण मंत्री श्री.दादाजी भिसे यांची बैठक.
· महिला व बालविकास विभागाच्या
योजना व कामकाजाचा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याद्वारे आढावा. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची साडेसहा हजार रिक्त पदे भरण्यास मान्यता. राज्यात 98 अंगणवाडी आणि 745 मिनी अंगणवाडी सुरु करण्यास मान्यता.
· भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी
पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन
घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी दि.
12 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत एसएसबी अभ्यासक्रम क्र. 52 आयोजित. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन
आणि प्रशिक्षणाची नि: शुल्क सोय.
· उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री
अजित पवार यांच्याद्वारे बारामती येथे सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी. विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण
करण्याचे श्री. पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश.
· महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2027 अंतर्गत 3 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री ; 21 जानेवारी रोजी रिझर्व्ह बँकेमार्फत फोर्ट कार्यालयात लिलाव.

Comments
Post a Comment